पेरुमध्ये स्थानिक बाजारपेठेचा विचार करुन आपणास कोणता बहार धरावयाचा आहे, याचा निर्णय घ्यावा. ज्या शेतकरी बंधूंना मृगबहार धरावयाचा आहे. त्यांनी पेरूच्या बागेस फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कालावधीत पाणी देऊ नये, हा काळ उन्हाळ्याचा असल्याने पाण्याची देखील टंचाई असते. तसेच या बहाराची फळे हिवाळ्यात तयार होत असल्याकारणाने या बहारातील फळामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो. त्याचप्रमाणे फळांची गुणवत्ता ही उत्तम प्रकारची असते.
या कालावधीमध्ये झाडांना पाण्याचा ताण देताना भारी जमिनीस ४o ते ६० दिवसांचा तर हलक्या जमिनीस ३० ते ३५ दिवसांचा ताण पुरेसा होतो. पाणी तोडल्यामुळे झाडांची वाढ थांबते व पानगळ होते. त्यामुळे झाडांना पूर्ण विश्रांती मिळून झाडांमध्ये अन्नद्रव्यांची साठवण होते आणि हे अन्नद्रव्य पुढे पाणी दिल्यानंतर फुलोरा निर्माण करण्यास मदत करते.
अर्धवट पानगळतीनंतर बागेतील जमिनीची नांगरष्ट करून मशागत करावी. बागेतील तण पूर्णपणे काढून टाकावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. जास्त पाण्याचा ताण दिल्यास पानगळही जास्त होते. फुले धरणा-या काड्यांची मर होऊन झाडांना हानी होते म्हणून ताण काळजीपूर्वक द्यावा. उन्हाळ्यात जमीन तशीच तापू द्यावी. मे महिन्याच्या शेवटी पूर्ण वाढलेल्या झाडास २५ ते ३० किलो शेणखत व ६oo:३oo:३00 ग्रॅम अनुक्रमे नत्र, स्फुरद व पालाश या खतांची मात्रा प्रती झाड या प्रमाणात द्यावी. नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे

