गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा– पाटस सहकारी साखर कारखाना येत्या हंगामात सुरु झाला. यामुळे सध्या समाधान व्यक्त केले जात आहे. हा कारखाना कर्नाटकातील निराणी ग्रुपने चालवायला घेतला आहे.
आता भीमा– पाटसचा उसाचा पहिला हप्ता २५०० रुपये उस उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी ही माहिती दिली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा साखर कारखान्याचा गाळप हंगाम मागील काही दिवसांपासून सुरू झाला आहे. सध्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात गाळपासाठी उस भीमा पाटसला देत असल्याचे चित्र आहे.
कारखान्याचे ५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे उसाचे गाळप झाले आहे. एम.आर.एन.भीमा शुगर अँड पावर लि. संचलित (निराणी ग्रुप ) भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गाळपास आलेल्या उस उत्पादकांच्या उसाचे पहिल्या हप्ता पहिल्या पंधरवड्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी दिली.
कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या ३५ हजार टनाचे २५०० रुपये प्रति टनाप्रमाणे पाहिल्या हप्त्याचे ९ कोटी रुपये संबंधित उस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत, तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे बिलही प्रत्येकी दहा दिवसानंतर अदा करण्यात आले आहे. यामुळे कधी काळी आता हा कारखाना सुरु होणार की नाही, असे असताना आता समाधान व्यक्त केले जात आहे.
त्यामुळे भीमा पाटस कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला गाळपासाठी देण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष कुल यांनी केले आहे. यामुळे शेतकरी सभासद समाधानी आहेत.