पुणे : देशातील बाजारात सध्या देशी हरभऱ्याचे दर दबावात आहेत. मात्र गुणवत्तेच्या मालाचा तुटवडा जाणवत आहे. तर काबूली हरभऱ्याचा भाव चांगलाच वाढला. पुढील काळात देशी हरभऱ्याचा भाव लागवडीवर अवलंबून आहे. तर काबुली हरभऱ्याचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
देशात सध्या रब्बीतील हरभरा पेरणी सुरु झाली. तसा विचार केला तर सध्याचा काळ हा हरभरा आवकेचा नाही. मात्र असे असतानाही बाजारातील हरभरा दर सध्या दबावात आहेत. मगील हंगामात देशात विक्रमी हरभरा उत्पादन झाले. तसेच नाफेडने खरेदी केलेला हरभरा नियमित बाजारात आणला. परिणामी हरभरा बाजारात दबावातच राहीला. हरभरा दर सध्या सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
देशातील बाजारात सध्या गुणवत्तापूर्ण हरभऱ्याची टंचाई जाणवत असल्याचं व्यापारी सांगत आहेत. तसेच हरभऱ्याला लग्न सराई आणि समारंभामुळे मागणी वाढली आहे. परिणामी किमान दरात हरभऱ्याला प्रक्रिया उद्योगांकडून चांगला उठाव मिळतो आहे. या मागणीमुळे नाफडेच्या विक्रीनंतर दर जास्त घसरले नाहीत, असंही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मुंबई, दिल्ली, इंदोर, जयपूर आदी महत्वाच्या बाजारांमध्ये ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळतो आहे. मात्र दर अद्यापही हमीभावापेक्षा कमी आहेत. हरभऱ्याच्या दरात पुढील काळात मर्यादीत वाढ होऊ शकते, असेही बाजारातील जाणकारांनी सांगितले.
काबुली खातोय भाव
देशातील बाजारात देशी हरभरा दर दबावात असले तरी काबुली हरभरा सध्या चांगला भाव खात आहे. काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आल्यानंतर देशात मागणी काहीशी कमी झाली. मात्र भारतीय काबुली हरभऱ्याला दुबई, सौदी अरेबिया आणि कोलंबो या देशांमधून मागणी वाढली. त्यामुळं मागील आठवडाभरात काबुली हरभऱ्याच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी १२ हजार ते १५ हजार रुपये दर मिळत आहे.
कसा राहील बाजार?
काबुली हरभऱ्याचे दर वाढल्यानं देशातील बाजारातून उठाव कमी झाला. मात्र निर्यातमागणी वाढली. परिणामी काबुली हरभरा तेजीतच राहिल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच देशातली नवा काबुली हरभरा हाती येण्यास आणखी बरेच दिवस बाकी आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या कमी साठ्यावरच गरज भागवावी लागेल. त्यामुळे देशातील नवा काबुली हरभरा हाती येईपर्यंत दरातील ही तेजी कायम राहील. तर देशी हरभऱ्याचे दर देशातील पेरणी आणि नाफेडच्या विक्रीवर अवलंबून राहतील, असा अंदाज कडधान्य बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

