तुरीचा भाव आता विक्रमीपातळीकडे वाटचाल करत आहे. तुरीच्या दरातील तेजी वाढत आहे. दर वाढत असले तरी बाजारातील आवक कमीच आहे.
मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने सरकारचा दबाव असूनही दरपातळी वाढत गेली. देशातील अनेक बाजारात तुरीच्या भावाने ११ हजार रुपयांचा टप्पा पार केला.
देशातील बहुतेक बाजारात तुरीच्या दराने १० हजारांचा टप्पा पार केला. तर अनेक बाजारात ११ हजारांवर तूर पोचली. तुरीच्या दरातील तेजी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. पण पुरवठाच कमी असल्याने सरकारच्या प्रयत्नांना यश आले नाही.
यंदा जागतिक पातळीवर तुरीचा पुरवठाच कमी आहे. भारत सरकारने यंदा देशातील तूर उत्पादन ३४ लाख टनांवर स्थिरावल्याचे सांगितले. तर ग्लोबल पल्सेस काॅन्क्लेव अर्थात जीपीसीने यंदा भारताचे उत्पादन ३२ लाख ५० हजार टनांवर आल्याचे सांगितले.
भारताला दरवर्षी ४५ लाख टन तुरीची गरज असते. तर उत्पादन कमी जास्त होत असते. यंदा उत्पादनातील घट मागील काही वर्षांतील निचांकी आहे. व्यापारी आणि उद्योगांच्या मते, उत्पादन ३० लाख टनांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे देशात पुरवठा कमी आहे.
जीपीसीच्या अंदाजनुसार यंदा जागतिक तूर उत्पादन ४२ लाख टनांवर आले. म्हणजेच जागतिक तूर उत्पादन भारताच्या वापरापेक्षाही कमी आहे. भारताशिवाय म्यानमारमध्ये २ लाख ७५ हजार टन तर आफ्रिकेत ७ लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाजही जीपीसीने व्यक्त केला. Tur Market Rate
भारत यंदा तुरीची आयात वाढवून ९.५० लाख ते १० लाख टनांपर्यंत करेल, असा अंदाज जीपीसी आणि भारत सरकारने व्यक्त केला. पण आयातदार आणि व्यापाऱ्यांच्या मते यंदाही भारताला ८ लाख ५० हजार टनां=पेक्षा जास्त आयात करता येणार नाही.
आफ्रिकेतील देशांमध्ये आता निर्यातयोग्य तूर शिल्लक नाही. म्यानमारमध्ये स्टाॅक आहे. पण येथील निर्यातदार सध्याच्या भावात निर्यात करण्यास इच्छूक दिसत नाहीत. त्यामुळे म्यानमारमधून येणारी निर्यातही घटली आहे. तसेच आयात तुरीचे भावही ९ हजारांच्या दरम्यान आहेत.
एकूणच काय तर देशात तुरीचा तुटवडा आहे. आफ्रिकेतून नोव्हेंबरपासून तूर आय़ात होऊ शकते. देशातील तूर येण्यास सात महिन्यांचा कालावधी लागेल. आयातही कमी होत आहे.
चालू खरिपात पाऊसमान कसे राहते आणि तूर लागवड तसेच उत्पादन कसे राहते यावरही बाजार अवलंबून असेल. पण नवा माल बाजारात येईपर्यंत तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला