राज्यात आज पावसाचा जोर कमी झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात हलक्या सरी पडल्या. पण मराठवडा आणि खानदेश तसेच नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी भागात पावसाची उघडीप होती. आज हवामान विभागाने काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला.
हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही भागांमध्ये जोरदार पावासाचा येलो अलर्ट दिला. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. तर संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्याता आला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांना ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर खानदेश आणि नाशिक भागातही पावसाचा जोर कमी आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील. तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, नगर या जिल्ह्यांमध्येही हलक्या सरी होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस कालपासून थांबला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळी कमी झाली असून पुरही ओसरला. रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली. मुसळधार पावसात तब्बल सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, पाटण, जावळी तालुक्यात पाऊस सुरू असून इतर तालुक्यात पाऊस कमी झाला. नांदेड जिल्ह्यात चालू आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा जोर आता ओसरला. सागंली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने उघडीप दिली.
नगर जिल्ह्यातील अन्य भागात पाऊस नसला तरी अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर कायम आहे. नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी आज पावसाचा जोर पाहायला मिळाला. तर खानदेशातील काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मराठवाड्यातही पावसाचा जोर कमी झाला असून उघडीप असल्याचे दिसते. विदर्भातही अनेक भागांमध्ये पाऊस कमी झाला. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या दरमी पडल्या.