कोल्हापूर : यंदाच्या ऊस हंगामात गेल्या वर्षीप्रमाणेच मराठवाड्याचा हंगाम सर्वाधिक चालण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये उसाच्या क्षेत्रात वाढ कायम आहे. यामुळे यंदाही सर्वांत शेवटी मराठवाड्याचा हंगाम संपण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांची आहे.
२०२१ – २२ चा गळीत हंगाम हा गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी ठरला. मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांत विक्रमी म्हणजे २०० दिवसांपर्यंत साखर हंगाम चालला. उसाचे राजे समजल्या जा��ाऱ्या कोल्हापूर सांगली भागालाही यंदा मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी हंगामाच्या बाबतीत बरेचसे मागे टाकले. पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांचा हंगाम सरासरी १५० दिवसापर्यंत चालला. पण या जिल्ह्यांतील हंगाम १९० ते २०० पेक्षा जास्त दिवसांपर्यंत चालला. यंदाही या जिल्ह्यांमध्ये ऊस क्षेत्रात वाढ नोंदवण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक २०८ दिवस हंगाम चालला, तर उसाचे प्रमुख क्षेत्र असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात १३५ दिवस उसाचे गाळप झाले. यावरूनच मराठवाड्यातील ऊस क्षेत्राची कल्पना येऊ शकते.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये यंदा उसाखाली ३.९१ लाख हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या हंगामात मराठवाड्यात ३.३९ लाख हेक्टर उसाचे क्षेत्र होते. यामुळे शासकीय यंत्रणा बरोबरच कारखाना पातळीवरही ऊस तोडणीचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. मे महिन्यात सर्वच यंत्रणावर ताण आल्याने ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर यंदा नियोजनबद्ध गाळप अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक अग्रेसर कारखान्यांकडे गाळपासाठी उपलब्ध ऊस व त्यासाठी लागणारी ऊसतोडणी यंत्रणा याचा बरोबर अंदाज असतो. यामुळे काही दिवसांचा अपवाद वगळता हंगाम संपण्यास अडचणी येत नाहीत, असा अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे. स्वतःच्या कार्यक्षेत्रातील उसाची नोंदणी व्यवस्थित होत आहे.
🔹मराठवाड्यातील नियोजन विस्कळीत : यंदा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एप्रिलमध्येच ऊसतोडणी हंगाम संपवला. ही बाब मराठवाड्यातील कारखान्यांना साधता आली नाही यामुळे जूनपर्यंत साखर कारखाने चालले. यंदा निर्धारित कालावधीत उसाची तोड करण्यासाठी विशेष करून मराठवाड्यातील कारखान्यांना मोठी कसरत सुरुवातीपासूनच करावी लागेल, अशी शक्यता असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
🔹जादा तोडणी यंत्रणांची गरज : गेल्या पंधरा दिवसांपासून मराठवाड्यातील ऊस पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. यामुळे उसाची वाढ चांगली होईल, असा अंदाज त्या भागातील कारखानदारांचा आहे. उसाचे टनेज वाढल्यास ऊसतोडणी ही लवकर आवरत नाही. यामुळे सर्वच यंत्रणांना आतापासूनच जादा यंत्रणा तोडणीसाठी लावावी लागणार आहे.
सोर्स : अग्रोवोन न्युज