आपण रस्त्याने येत-जात असताना आपल्याला अनेक ठिकाणी चौकाचौकात पोस्टरबाजी पाहायला मिळते. कुठे राजकीय, सामाजिक कार्यकर्ते युवानेते यांचे पोस्टर लावले दिसतात. पण नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात एक हटकेबाज शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आलेला पोस्टर लावण्यात आलेला आहे.
धुळवड गावात लावण्यात आलेला हा पोस्टर आता चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. हा पोस्टर टोमॅटोमुळे करोडपती, लखपती झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेला आहे. हा पोस्टर पाहून अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, हे शेतकरी पहिल्यापासून श्रीमंत असतील. पण तसं नाही या शेतकऱ्यांना टोमॅटोने पार करोडपती केले आहे.
कायमच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला आता टोमॅटोच्या दरामुळे चांगले दिवस आले आहेत. टोमॅटोची लाली ही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देणारी ठरली आहे. आपल्या शेतातील पिके निसर्गाच्या भरवश्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाने कायम निराशा दाखवली आहे. परंतु यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना निसर्ग आणि बाजाराने साथ दिल्याने धुळवड गावच्या शेतकऱ्यांना जणू लॉट्रीच लागली आहे.
दरम्यान, मागील महिन्यापासून टोमॅटोच्या दरात झालेली वाढ आजूनही कायम आहे. सध्या किरकोळ बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो सुमारे १५० ते २०० रुपये दर मिळत आहे. एकूणच २० किलोची एक कॅरेट सुमारे २१००-२००० रुपयांना विकली जात आहे. काही शेतकऱ्यांना एकरी दहा बारा लाखांचे तर काहींना सात आठ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

