मागील आठवडाभरात तूर बाजारात समिश्र स्थिती राहिली. आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीला उठाव कमी होता. तर देशातील तूर शेतकऱ्यांनी मागं ठेवल्याचं दिसतं. त्यामुळं तुरीच्या दरात काहिसे चढ उतार होते.
सरकारने तूर आयातीवरील १० टक्के शुल्कही काढले. पण भारतात प्रामुख्याने आफ्रिका आणि म्यानमारमधून तूर आयात होते. हे देश अविकसित असल्याने या देशांमधून आयात होणाऱ्या तुरीवर शुल्क लागू होत नाही. त्यामुळं सरकारच्या या निर्णयाचा तूर बाजारावर परिणाम होणार नाही.
देशात यंदा उत्पादन घट जास्त असल्याने आयातीतूनही गरज पूर्ण होणार नाही. त्यामुळं तुरीचे दर तेजीत राहतील. मार्च महिन्यात सध्याच्या दरात १०० ते २०० रुपयांचे चढ उतार राहू शकतात. पण गुणवत्तेच्या तुरीचे भाव ८ हजार रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता नाही.
एप्रिल महिन्यापासून तुरीची आवक कमी राहून दरवाढ होऊ शकते. तर मे आणि जून महिन्यात तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याचा अंदाज आहे. तुरीचे दर सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात.
त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढाव घेऊनच आपले दराचे टार्गेट ठरवावे आणि विक्री करावी, असं आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केले.