शेतकऱ्यांनी आता मार्केटिंगचा शेतीमालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही, •असे चित्र असताना हातावर हात ठेवून न बसता अनेक ऑनलाईन फंडा स्वीकारला आहे. मोबाईल, समाजमाध्यमातून विविध ऑर्डर घेऊन थेट महानगरातील ग्राहकाला भाजीपाला, फळे, फळभाज्या विकण्याचा हा नवीन ट्रेंड चांगलाच रुजू लागला आहे. एकट्या सांगली जिल्ह्यातूनच एक दिवस आड पुणे शहरात तीन टन भाजीपाला, फळे ऑनलाईन ‘कॅश अॅण्ड कॅरी’ या तत्त्वावर रवाना होत आहेत. मार्केटमध्ये उतरण्याचा शेतकरी पोरांचा हा उपक्रम चर्चेत आला आहे.
खरे तर मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा मूलभूत नियम ! पण मागणी इतका पुरवठा न झाल्यास नक्कीच बाजारभाव वाढून मिळू शकतो. विशेषतः मध्यंतरीच्या अवकाळी पावसाने शेतपिकाच्या उत्पादनात चांगलीच घट झाली आहे. यातून बाजारात शेतमालाचे दर भडकले आहेत. मात्र, हा वाढीव दर उत्पादकाला न मिळता तो मध्यस्थ, दलाल, अनेकवेळा व्यापारी यांच्या पदरात पडत आहे, तसेच केंद्र शासन दरवर्षी पिकांना हमीभाव जाहीर करते. मात्र, हमीभावाने शेतमाल खरेदीची व्यवस्थाच नसल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजाराखेरीज पर्याय राहत नाही. यातूनच अनेक हमखास भाव मिळण्यासाठी आता ‘शिवार ते थेट ग्राहक व्हाया ऑनलाईन’ असा फंडा स्वीकारू लागले आहेत.
नवीन संकल्पना
शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रोड्यूसर्स कंपनी हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यात प्रोड्यूसर्स कंपनीच्या संकल्पनेला अनेक लहान शेतकरी आणि उत्पादकांतून प्रतिसाद मिळत आहे. याचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकरी किंवा उत्पादकांची होणारी लूटमार थांबवणे हा राहिला आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी थेट महानगरातील ग्राहकांशी थेट संपर्क सुरू अर्थात यासाठी त्यांना विविध समाजमाध्यमांची मोठी मदत होऊ लागली आहे. प्रामुख्याने व्हॉटस् अॅपवरील विविध ग्रुप यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना मदतकारक ठरू लागले आहेत. फेसबुकवरील विविध माध्यमातून देखील शेतकरी, विशेषतः युवा शेतकरी उत्पादक आपल्या शेती उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ मिळवू लागले आहेत. यातूनच आता शेतीमालाचाही ऑनलाईन मागणीवरून पुरवठा, विक्री करण्यात आघाडी घेऊन जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे ऑनलाईन मार्केटिंग सुरू केले आहे.
पुण्यातील आयटी पार्कमध्ये जातो तीन टन भाजीपाला
जिल्ह्यातील काही उपक्रमशील शेतकरी युवकांनी एका कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून असा उपक्रम सुरू केला आहे. अनेकांनी वैयक्तिक पातळीवर देखील अशी ऑनलाईन बुकिंग आणि थेट शहरातील ग्राहकाला विक्री देखील सुरू केली आहे. दरम्यान, याबाबत वाळवा येथील निखिल मग म्हणाले, आम्ही एका कंपनीच्या माध्यमातून शिवारातून थेट महानगरातील ग्राहक अशी नवीन व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. प्रामुख्याने पुण्यातील आयटी पार्कमध्ये भाजीपाला, फळे, फळभाज्या आदींची विक्री करण्यात येते. एक दिवसआड तीन टनाच्या घरात अशी विक्री होत आहे. पुणे येथे व्हेंडर आहेत. ते ठिकठिकाणी भाजीपाला पुरवितात.