गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यात वाद सुरु आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. असे असताना दौंड येथील यवतमध्ये काहीसा वेगळा प्रकार घडला आहे. महावितरणने वीजबिल थकल्याने यवत परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद केला. परिसरातील ७० पेक्षा अधिक विद्युत रोहित्रांचा वीजपुरवठा महावितरणने बंद करून टाकला.
शेतकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या, मात्र कोणीच ऐकले नाही. मग शेतकऱ्यानी यवत उपकेंद्रांतून उरूळी कांचनला येणारा वीजपुरवठाच बंद करून टाकला. उपकेंद्रांकडील रोहित्रांचे विद्युत जोड सोडवून ठेवल्याने अचानकच सात गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला. यामुळे सगळेच अंधारात बसले होते.
अनेकदा फ्यूज गेला, लिंक तुटली किंवा इतर समस्या आली, तर वाड्यावस्त्यांवर वायरमन काम करीतच नाही, ते सारे काम शेतकरीच करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना काय जोडायचे आणि काय तोडायचे हे माहिती असते, त्याचा पध्दतशीर वापर शेतकऱ्यांनी या अभिनव आंदोलनात करून घेतला. यामुळे याची राज्यात चर्चा सुरु आहे.
यामुळे उरूळी कांचन, अष्टापूरसह परिसरातील सात गावे काही तासांपासून अंधारात होती. दरम्यान, पोलिसांची मध्यस्थी केल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून हे उपकेंद्र पूर्ववत करून सात गावांचा वीजपुरवठा जोडला. यामुळे शेतकऱ्यांनी ठरवले तर तो काहीही करू शकतो, याचा प्रत्यय याठिकाणी आला.
दरम्यान, महावितरणच्या त्रासाला कंटाळून राज्यात औरंगाबादच्या खंडपीठापुढे महावितरणच्या वीजेच्या खांबाच्या भरपाईबाबतची एक याचिका सुनावणीला आली. ती आता जिल्हाधिकाऱ्याकडे निर्णयासाठी सोपवली आहे. यामुळे याकडे सरकारने लक्ष देणे गरजचे आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे.