आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाचे दर सध्या दबावात आहेत. अमेरिकेतील दोन बॅंका संकटात आल्यानंतर शेतीमालाच्या बाजारात नरमाई दिसली. कापसासह सोयाबीन, खाद्यतेल, मका आणि गहू या सर्वच शेतीमालांच्या दरात घट झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातील कापसाची आवक जास्त आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी आवक झाली. शेतकऱ्यांना कापूस साठवण्यात अडचणी आहेत.
त्यामुळं शेतकरी कापूस विकत आहेत, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. मागील हंगामात मार्च महिन्यात कापसाचे भाव ९ हजारांच्या पुढे होते. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी ९० टक्के कापूस विकला होता. यंदाही मार्चमध्ये दर वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला होता.
पण दर वाढण्याऐवजी दबावात आले. त्यामुळे शेतकरी पॅनिक सेलिंग करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सध्या ७८.१२ सेंट प्रतिपाऊंडवर आहेत. तर देशातील वायदे ६१ हजार ३४० रुपये प्रतिखंडीवर होते.
बाजार समित्यांधील दर प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळत आहे. एप्रिलच्या मध्यानंतर कापूस आवक कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं झाल्यास कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.