पुणे : जवळपास आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून राज्यात दमदार कोसळणाऱ्या पावसाचा (Heavy Rains) जोर ओसरण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १५) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील तुरळक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे स्थिरावलेला मॉन्सूनचा आस, महाराष्ट्राच्या (Maharashtra) मध्य भागातून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र या वातावरणीय प्रणाली कायम आहेत. यातच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे स्थिरावलेला मॉन्सूनचा आस, महाराष्ट्राच्या (Maharashtra) मध्य भागातून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र या वातावरणीय प्रणाली कायम आहेत.
आज (ता. १५) कोकणातील (Kokan) पालघर, रायगड मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, नाशिक आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गुजरात किनाऱ्यावर कमी दाबाचे संकेत : पूर्व किनाऱ्यावरील ठळक कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता ओसरून उत्तर ओडिशा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
उद्यापर्यंत (ता. १६) अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, पश्चिमेकडे सरकताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर पासून ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत असून, रविवारपासून ते उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर.
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
सोर्स क्रेडिट : सकाळ

