देशातील बहुतांश भागांत मार्च ते मे या तीन महिन्यांत उष्णेत्या लाटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हणजे ‘आयएमडी’ने तसा अंदाज व्यक्त केला आहे.
एरवी फेब्रुवारी महिना गुलाबी थंडीसाठी ओळखला जातो. परंतु यंदाचा फेब्रुवारी मात्र त्याला अपवाद ठरलाय. दिवसा कडाक्याचं ऊन आणि रात्री व पहाटे थंडी असा माहौल बहुतांश ठिकाणी राहिला. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात दिवसा कडक उन्हाळ्याचा अनुभव आला.
यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १२२ वर्षांतला सगळ्यात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. फेब्रुवारीमध्ये सरासरी कमाल तापमान २९.५४ अंश सेल्सिअस राहिलं. १९०१ नंतरचा हा उच्चांक आहे. गेल्या १२२ वर्षात यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा १.७३ अंश जास्त राहिले, तर किमान तापमान सरासरीपेक्षा ०.८१ अंश जास्त राहिले.
चक्रीवादळांची घटलेली संख्या, त्यामुळे झालेला मर्यादित पाऊस यामुळे फेब्रुवारीत उष्णता वाढल्याचं भान यांनी सांगितले. तसेच मार्च महिना फेब्रुवारीपेक्षा उष्ण ठरेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.
उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका मध्य आणि उत्तर भारताला बसण्याची शक्यता आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी उष्णतेची लाट आली, तर गहू, मोहरी आणि हरभऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकार अन्न महागाई कमी करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना त्यामुळे मोठा फटका बसू शकतो.
तसेच तापमान वाढल्यामुळे विजेची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजेच्या पुरवठ्यावर ताण येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मार्च महिना हा अनेक रब्बी पिकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण त्या वेळी पिकांच्या वाढीची संवेदनशील अवस्था असते. या काळात तापमान जास्त राहिलं तर पिकाची वाढ नीट होत नाही.
गहू, हरभऱ्यासारख्या पिकांना जास्त तापमान चालत नाही. उत्पादनावर लगेच परिणाम होतो. नेमक्या याच महिन्यात देशातील बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा आयएमडीचा अंदाज आहे.
मुंबई येथील एका निर्यातदाराने सांगितले, की वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या पिकाला आताच ताण बसू लागला आहे. मार्च महिन्यात उष्णता जास्त वाढली तर उत्पादनात नक्कीच घट होईल, असे त्याने सांगितले.
भारतात प्रामुख्याने उत्तर भारतात गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये गव्हाची लागवड केली जाते, तर मार्चपासून गव्हाची काढणी सुरू होते. गेल्या वर्षीही उष्णतेची लाट आल्यामुळे गहू पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे रातोरात गव्हाची निर्यात बंद करण्याचा नामुष्की सरकारवर ओढवली होती.
सरकार विक्रमी उत्पादनावर ठाम
यंदा केंद्र सरकारने विक्रमी गहू उत्पादनाचा अंदाज वर्तवला होता. परंतु आता उष्णतेच्या लाटेमुळे हा अंदाज फसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परंतु केंद्रीय कृषी आयुक्त पी. के. सिंह मात्र विक्रमी गहू उत्पादनाच्या अंदाजावर ठाम आहेत.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने वाढत्या उष्णतेचा गहू पिकावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने प्रमुख गहू उत्पादक राज्यांचा दौरा केला. तिथल्या पिकाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञांशी चर्चा केली.
त्यानंतर आयुक्तांनी सांगितले, की वाढत्या उष्णतेचा गहू पिकावर फारसा परिणाम होणार नाही. दिवसा तापमान जास्त असले तरी रात्रीचे तापमान कमी आहे. तसेच बहुतांश ठिकाणी पेरण्या वेळेवर झाल्या आहेत.
पंजाब, हरियानामध्ये ५० टक्के क्षेत्रावर तापमानाला सहनशील वाणांची लागवड झालीय. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता नसल्याचं मत आयुक्तांनी व्यक्त केलेय.
कृषी आयुक्तांचा हा अंदाज खरा ठरणार का, हा प्रश्नच आहे. कारण केंद्र सरकारला काही करून गव्हाचे दर पाडायचे आहेत. गव्हाचे दर हमीभावापेक्षा खाली आले तरच सरकारी खरेदीला प्रतिसाद मिळेल.
यंदा गव्हाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून सरकारी गोदामांतील साठा वाढवायचं लक्ष्य सरकारने ठेवले आहे. काढणी हंगाम सुरू होण्याच्या आधीच गव्हाचे उत्पादन घटणार असल्याची कबुली सरकारने दिली तर त्याचा बाजारावर परिणाम होईल, गव्हाचे दर चढे राहतील.
त्याला छेद देण्यासाठी सरकारकडून गव्हाच्या उत्पादनाबद्दल आशादायक चित्र रंगवले जातेय का, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.