गोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते, तसेच जनावरांचे दुग्ध उत्पादन वाढते. गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी, जेणेकरून गोठ्यातील मल-मूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चाऱ्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी. गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी.
गोठ्यातील गटार, गव्हाण व जनावरांना उभे राहण्याच्या जागेवर भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शक्यतो लांबीच्या बाजूने गोठा दक्षिण-उत्तर दिशेस असावा. गोठ्यातील जमिनीकरिता भाजलेल्या विटा किंवा दगडी फरशा असाव्यात. जमिनीस गव्हाणीकडून उतार दिलेला असावा. जनावरांना योग्य पद्धतीने चारा खाता येईल या पद्धतीने गव्हाण बांधावी. गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावा. गोठा हवेशीर राहील या पद्धतीने भिंतीचे बांधकाम करावे. गोठ्यातील छत वजनाने हलके, कठीण व टिकाऊ असावे. जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध राहण्यासाठी टाकी कॉंक्रिटमध्ये बांधून घ्यावी. जनावरांचे शेण- मूत्र जमा करण्यासाठी गोठ्याच्या कडेने योग्य आकाराचे गटार करावे. गोठा बांधताना पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
गोठा बांधण्याच्या पद्धती
शेपटीपुढे शेपटी पद्धत
या पद्धतीमध्ये जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते. जनावराचे तोंड बाहेरच्या बाजूस असल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी असते, तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा मिळते. दूध काढणाऱ्यांवर देखरेख करणे सोपे जाते. माजावरील जनावरे सहज ओळखता येतात. मजूर कमी लागतात.
तोंडाकडे तोंड पद्धत
तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचे योग्य पद्धतीने निरीक्षण करता येते. गोठ्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा असल्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. जनावरांना चारा टाकणे सोपे जाते. रोगप्रसार कमी प्रमाणात होतो.
हिवाळा ऋतू
पशुपालन व्यवसायासाठी हिवाळा ऋतू अत्यंत पोषक आणि उपयुक्त ठरतो. सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, भरपूर पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे जनावरांच्या आरोग्य व प्रजननास हिवाळा हितावह ठरतो. तेव्हा हिवाळ्याच्या तीन-चार महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक जनावराचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूक असावे.
गाय, म्हैस, बैल, रेडा या प्राण्यांची प्रजननक्षमता हिवाळ्यात सर्वांत उच्च असते. प्रजननक्रिया सुलभ व नियमित होणे म्हणजे पुढे मिळणाऱ्या वासरू व दुधाची खात्री असते. हिवाळ्यात प्रजननक्रिया योग्य प्रकारे घडल्यास पुढे येणाऱ्या उन्हाळ्यासारख्या कडक व प्रतिकूल ऋतूचा जनावरास विशेष अपाय होत नाही.
जनावरांना सुलभ प्रजननासाठी चांगले आरोग्य व सुदृढ प्रकृतीमानाची गरज असते. पावसाळ्यात वाढीस लागलेली जनावरे पोषक वातावरण, तसेच हिरवा व वाळलेला चारा मिळत असल्यामुळे हिवाळ्यात धष्ट-पुष्ट होतात. खरीप पिकांचा चारा, हिरवे गवत, संतुलित आहार यामुळे जनावरांचे शारीरिक वजन वाढते.
हिवाळ्यातील थंडीचा जनावरांना अपाय होत नाही. थंडीमुळे आरोग्यास अपाय नसला तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने जनावरे रात्री व पहाटे गोठ्यात ठेवावीत. चांगल्या प्रकृतीमानामुळेच जनावरांच्या प्रजननाची क्रिया हिवाळ्यात सुरू राहते. हिवाळ्याच्या तीन-चार महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक जनावराचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूकता ठेवावी. जनावर माजावर येणे ही प्रजननाची पहिली पायरी असल्यामुळे आपली जनावरे माजावर येतात का याकडे लक्ष द्यावे.
जनावरांचा माज ओळखण्यासाठी सकाळी जनावरे गोठ्यात उभी राहण्यापूर्वी, तर सायंकाळी गोठ्यात परतलेली जनावरे बसल्यानंतर बळस, सोट टाकतात काय याचे निरीक्षण दररोज व प्रत्येक जनावरात करावे. माजावर आलेली जनावरे लक्षात आल्यास त्यांना योग्य वेळी कृत्रिम रेतन करून घेणे शक्य होते. अशा माहितीच्या आधारे हिवाळ्याच्या वातावरणाचा उपयोग घेता येऊन जनावरांची प्रजननक्रिया पशुपालकास नियंत्रित करता येते.
हिवाळ्यात जनावरे गाभण राहणे फायद्याचे
हिवाळ्यातील उच्च प्रजननक्षमतेमुळे जनावरे गाभण ठरण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात जनावरे माजावर येऊन गाभण ठरण्याकडे लक्ष दिल्यास जनावरांकडून दूध व वेत मिळण्याची निश्चिती पशुपालकास करता येते. हिवाळ्यात गाभण जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.
याउलट हिवाळ्यात प्रजनन बंद असलेली जनावरे पुढे उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या अभावामुळे इतकी अशक्त होतात, की त्यांना पुढे पावसाळा संपेपर्यंत शरीर, आरोग्य राखणे शक्य होत नाही. एकदा हिवाळा संपला तर पुढे वर्षभर जनावर भाकड राहते.