यवतमाळ बाजार समितीमध्ये तीन ते चार दिवसांपासून तुरीचे भाव वधारले असून (Toor Dal Price Hike) तूर डाळीला 9 हजार ते 10 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे.
बाजार समितीमध्ये तूर उत्पादक शेतकरी तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. यवतमाळ बाजार समितीत दररोज तीन ते चार हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. असे असले तरी डाळीच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचं घर खर्चाचं बजेट कोलमडलं आहे. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी ताटातून वरण गायब होण्याची स्थिती आता निर्माण झाली आहे.
किरकोळ बाजारात गेल्या पंधरा दिवसांमध्ये तूर डाळ 15 रुपयांनी महागली आहे. त्यामुळे तूरडाळीचा दर 160 रुपये किलोवर पोहोचला आहे. तूरडाळीचे दर वाढत असल्याचा फटका तूरडाळ खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. यामुळे ती खरेदी करणे अवघड झाले आहे.
दरम्यान, साठा कमी झाल्यास तूर आणि उडदाचे भाव घसरतील किंवा भाव स्थिर राहू शकतात. आदेशानुसार, तूर आणि उडदाची साठा मर्यादा घाऊक विक्रेत्यांसाठी 200 टन, किरकोळ विक्रेते आणि किरकोळ दुकानदारांसाठी पाच टन आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी डेपोमध्ये 200 टन ठेवण्यात आली आहे
बेहिशेबी साठेदारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे कडक पाऊल उचललं आहे. तूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत 19 टक्क्यांनी वाढून 160 रुपये प्रति किलो झाली आहे. एका वर्षापूर्वी ही किंमत 103.25 रुपये प्रति किलो होती.