वाशी कृषी उत्पन्न बाजारसमितीत लसूण, कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एप्रिलपासून आवक घटली असून भाव वधारले आहेत. बाजारात आधी लसूण प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांनी मिळत होता.
आता ११० ते १५० रुपयांवर गेला आहे. तसेच पुढील काळात लसूण २०० पार करेल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन ओल्या लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येतात; मात्र यंदा लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी असल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे लसूण महागले आहे.
दरवाढीची प्रमुख कारणे
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये २०-२५ गाड्या आवक होती. एप्रिलपासून आवक कमी होत आहे. शुक्रवारी बाजारात अवघ्या १२ गाड्यांमधून २,५८३ गोणी लसूण दाखल झाला आहे.
गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात ९० ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या लसणाच्या दरात २०-३० रुपयांनी दरवाढ झाली असून, आता ११० ते १५० रुपयांवर दर गेले आहेत.
२०१७ मध्ये लसणाच्या दराने उच्चांक गाठला होता. प्रतिकिलो लसणाचे दर २०० ते २५० रुपयांवर गेले होते. पुढील काळात लसूण २०० पार करेल, अशी शक्यता आहे.