दूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणनादरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूध निर्मितीकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. दूध हे नाशिवंत असून जनावरांच्या कासेतून दूध काढल्यापासून ते दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

दूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणना दरम्यान दुधामध्ये संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे दुधाची प्रत ढासळण्याची शक्यता असते. परिणामी दूध नासते. अस्वच्छ दूध आरोग्यास हानिकारक ठरते. अशा दुधामध्ये रोगजंतूंची झपाट्याने वाढ होऊन गुणवत्ता खालावते.

त्यासाठी पशुपालकांनी दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूधनिर्मितीकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रत टिकून राहण्यास मदत होईल आणि चांगले दर मिळतील.

गोठ्याच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा उग्र वास येत नसावा.
धार काढताना भांड्यामध्ये धूळ उडणार नाही याची दक्षता घ्यावी.
गोठ्याची उघडी बाजू पश्चिमेस राहील अशा रीतीने गोठ्याची उभारणी असावी. यामुळे गोठ्यात हवा खेळती राहून घाण वास, डास, गोचीड, माश्या यांचा प्रादुर्भाव कमी होतो.

दूध काढण्याच्या अर्धा ते १ तास आधी केरकचरा व शेण काढून गोठा स्वच्छ करावा.
वर्षातून १ ते २ वेळा गोठ्याला चुना लावावा.
पाण्याच्या हौदाला सिमेंटचे प्लास्टर करावे.
दूध संकलनाच्या खोलीमध्ये कांदा, कीटकनाशके, खते, रंग, रॉकेल इत्यादी वस्तू ठेवू नयेत.

जनावरांचे खाद्य व पाण्याला उग्र वास येत नसावा.
कीडनाशक व बुरशीनाशके फवारलेला चारा जनावरांना देऊ नये.
आंबवण देताना नेहमी ओलसर करून द्यावे.
गोठा व भांडी धुण्यासाठी वापरलेले पाणी शुद्ध व स्वच्छ असावे. शक्यतो धुण्याच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतंत्र असावी.

दूध काढणारी व्यक्ती नेहमी स्वच्छ व निरोगी असावी. कोणतीही जखम किंवा संसर्गजन्य आजार नसावा.
कोणत्याही प्रकारचे व्यसन नसावे.
नखे वाढलेली नसावीत.
दूध काढण्यापूर्वी हात जंतुनाशकाने धुऊन घ्यावेत.