दीपक भोर्डे (शिरूर) यांनी वर्षापूर्वीची जूनी 12 क्विंटल बाजरी अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलला केडगाव (दौंड) मार्केटला विकली.

मका हा भरडधान्यांच्या मार्केटचा राजा आहे. मक्याचे भाव वाढले की बाजरीचेही वाढतात.
खरिपात बाजरी केली की पुढे कांद्याला लवकर क्षेत्र मोकळे होते. साधारण मक्यापेक्षा एक महिने आधी बाजरीचे पीक कापणीला येते. उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा हे बाजरीचे पारंपरिक बेल्ट.

गेल्या दोन दशकात बाजरीचे क्षेत्र मक्याने व्यापलेय. एकरी उतारा व बाजारभावात मका सरस ठरतो. म्हणून बाजरी मागे पडली. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत शहरी भागातील आहारात पुन्हा बाजरीला मागणी वाढू लागलीय. बऱ्याचदा मक्यापेक्षाही बाजरीचे दर उंच राहू लागले आहेत.

देशात बाजरीचे उत्पादन गेल्या पंधऱा वर्षात 80 ते 90 लाख टनादरम्यान स्थिर आहे. गेल्या खरीपात 7 लाख हेक्टरवर बाजरीचे पीक होते. 92 लाख टन उत्पादन झाल्याचे केंद्रीय कृषी खात्याचे अनुमान होते. यंदा उन्हाळ हंगामात तीन लाख हेक्टरवर देशभरात पेरा अनुमानित आहे.

पोल्ट्री व पशुखाद्यात मक्याचा तुटवडा असतो तेव्हा बाजरीला मागणी वाढते. अर्थात बाजारभावात खूप मोठा गॅप असला तरच उठाव मिळतो. युपी, राजस्थानातील बाजरी स्वस्त असली की महाराष्ट्रासह साऊथकडच्या फिडमिलकडून चांगली मागणी असते.

दीपक चव्हाण ,

शेतमाल बाजारभाव अभ्यासक