तांदळाच्या (rice) किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारताने तांदूळ निर्यातीवर बंदी घातल्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम जगभर पाहायला मिळत आहे.

व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जगभरात त्याच्या किमती वाढू शकतात, जे गेल्या दहा वर्षांपासून जवळजवळ स्थिर होते. जगभरात तांदळाचे जागतिक उत्पादन घटले असून जागतिक स्तरावर मागणी वाढली असताना भारताने ही बंदी घातली आहे.

 

तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने (india) तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असून बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात कर लावला आहे. परिणामी, जागतिक तांदळाच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.

भारताच्या बंदीचा जागतिक परिणाम

गेल्या महिन्यात, अन्न आणि कृषी संघटनेचा जागतिक मूल्य निर्देशांक 2.2 टक्क्यांनी वाढून 18 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ओलम इंडियाचे उपाध्यक्ष नितीन गुप्ता यांना विश्वास आहे की, जागतिक बाजारात तांदळाच्या किमती आणखी वाढतील.

 

दुसरीकडे, थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या प्रमुख तांदूळ निर्यातदार देशांकडे भारताच्या निर्यातीवरील निर्बंधांमुळे तुटवडा भरून काढण्यासाठी तांदळाचा पुरेसा साठा नाही.

आशियाई आणि आफ्रिकन देशांवर परिणाम

खराब पावसामुळे भारतातील भातशेती प्रभावित झाली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये सरकारला तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालावी लागली. त्याचवेळी शेजारील पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले.

 

महत्वाचे म्हणजे बांगलादेश आणि फिलिपाइन्स सारख्या प्रमुख तांदूळ खरेदीदार देशांमध्ये तांदळाचा वापर वाढला आहे. त्यामुळे लोकांना अधिक किमतीने तांदूळ खरेदी करावा लागण्याची शक्यता आहे.