भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे . जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन  भारतात होते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत हापूस, केशर, या वाणांची लागवड करण्यात मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. राज्यातून निर्यात होणा-या फळांमध्ये द्राक्ष, आंबा, डाळींब, लिंबूवर्गीय फळे आणि काजू यांचा मोठा वाटा आहे. सध्याच्या काळात निर्यातक्षम हापूस आणि केशर आंब्याला परदेशात मागणी वाढत आहे.

अांब्याचा पल्प हा मोठया प्रमाणात निर्यात होत आहे. ही निर्यात वाढविण्यासाठी दर्जेदार उत्पादनाबरोबरच त्यासाठी लागणा-या गुणवत्ता प्रमाणकाकडेही तेवढेच लक्ष शेतक-यांना द्यावे लागणार आहे. भारताच्या जागतीक व्यापार संघटनेच्या सदस्यत्वामुळे आणि कृषि क्षेत्राच्या जागतीक व्यापारामधील समावेशामुळे फळांच्या निर्यातीसाठी चांगल्या संधी निर्माण झालेल्या आहेत. विशेषत: आंब्याची मोठयाप्रमाणात झालेली लागवड आणि उत्पादन पाहता या फळांच्या निर्यातीस चांगला वाव राहणार आहे.

निर्यातक्षम अांब्याच्या उत्पादनाकरिता शेतक-यांनी घ्यावयाची काळजी

 1. आंब्यावरील प्रमुख किडी व रोगांचे प्राथमिक अवस्थेत नियंत्रण करावे. त्यामुळे फळांचा दर्जा खराब होत नाही व उर्वरित अंश मर्यादेत ठेवता येते.
 2. फळांचा दर्जा हा वजन ,आकार व रंग यावर ठरविला जात असल्याने अशा दर्जाची फळे जास्तीतजास्त उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रीत करावे.
 3. विशेषत: फळमाशी व स्टोनव्हीवील या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी व एकात्मिक किंड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा.
 4. साक्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने हापूस आंब्यात होतो त्याकरिता सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. तसेच आंबे २ टक्के मिठाच्या पाण्याच्या द्रावणांत बुडवल्यास जो आंबा पाण्यावर तरंगतो, असा आंबा बाजुला काढ़ावा.
 5. युरोपियन देशांना आंबा निर्यात करावयाचा झाल्यास उर्वरित अंश तपासून घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या पुणे येथील किडनाशक उर्वरित अंश प्रयोगशाळेत तपासणीच्या सुविधा उपलब्ध आहेत.
 6. आयातदार देशाच्या मागणीनुसार आंब्याची प्रतवारी करणे आवश्यक आहे.

फळाच्या आकारानुसार वर्गवारी

आकार गट वजन ( ग्रॅममध्ये जास्तीत जास्त वजनातील फरक
२००-३००- ७५
३५१-५५० १००
५५१-८००- १२५

गुणवत्तेत सुट मर्यादा : विशेष दर्जा ५ टक्के, वर्ग-१ साठी १० टक्के, व वर्ग-२ साठी १o टक्के आकारामध्ये सुट मर्यादा : सर्व वर्गाच्या आंब्याकरीता १० टक्के सवलत. कमीतकमी १८o ग्रॅम व जास्तीतजास्त ९२५ ग्रॅम अांब्याचे वजन असणे आवश्यक .

आंबा काढणीपूर्व व्यवस्थापन

 • आंबा फळांना आकर्षक रंग येण्यासाठी झाडांच्या आतील भागांची विरळणी करावी. जेणेकरून सुर्यप्रकाश आतील फळांवर पडेल.
 • फळांचा आकार वाढविण्यासाठी तसेच त्यांना तजेलदार व आकर्षक रंग येण्यासाठी फळे अंडाकृती झाल्यावर आणि कोय (बाष्ठा) तयार होण्याच्या अवस्थेत असतांना २ टक्के युरीया व १ टक्के पोटॅशची फवारणी करावी. फलधारणा झाल्यावर ज्या ठिकाणी पाण्याची सोय असेल अशा ठिकाणी १५ दिवसांनी ३ ते ४ वेळा पाणी द्यावे. (१५० ते २०० लिटर) परंतु फळे तोडणीच्या एक महिना अगोदर पाणी देणे बंद करावे.
 • फळे काढणीपुर्वी किमान तीन आठवडे अगोदर कोणत्याही किटकनाशकाची अथवा बुरशीनाशकाची फवारणी करू नये.
 • ज्या ठिकाणी फळे घोसाने येतात त्या ठिकाणी शक्य असल्यास दोन फळांमध्ये सुकलेले आंब्याचे पान ठेवावे तसेच मोहराच्या शेंडयाकडील फळावर घासणारे टोक कापून टाकावे. फळांचा आकार वाढविण्यासाठी शक्यतो प्रत्येक घोसावर एकच फळ ठेवावे.

सन २०१४-१५ पासून युरोपीयन व इतर देशांना आंबा निर्यातीकरीता फळमाशी व किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाची हमी देण्याकरिता द्राक्षाप्रमाणेच मॅगोनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीची अपेडाच्या मार्गदर्शनाखाली अवलंबविण्यात येत आहे.

निर्यातक्षम अांबा उत्पादक शेतक-यांची नोंदणी करण्याकरिता मॅगोनेटचा अवलंब करण्यात येणार आहे. त्याकरीता सन २0१५-१६ या वर्षांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, बीड व जालना या जिल्ह्यांकरिता तो अवलंबविण्यात येत आहे.

मॅगोनेटच्या अंमलबजावणी करिता सविस्तर मार्गदर्शक सुचना सर्व संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना कळविण्यात आल्या अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडे नोंदणी करण्याकरिता कळविण्यात आले आहे.

आंब्याच्या निर्यातीकरिता काढणीपश्चात व्यवस्थापन

 1. काढणीसाठी १४ आणे (८५ टक्के) तयार आंबा निवडावा.
 2. फळाची काढणी सकाळी ११ वाजेपर्यंत किंवा सायंकाळी ४ वाजल्यानंतर कमी तापमानात करावी.
 3. काढणीनंतर फळे कमी तापमानात ठेवावीत.
 4. काढणी देठासहीत (३ ते ५ सें.मी.) करावी.
 5. काढणीनंतर कमीतकमी वेळा (६ तास) आंब्याची पॅकींगपुर्व हाताळणी प्लॅस्टीक आवेष्टनातून करावी.
 6. आंब्यामध्ये एकूण विद्राव्य घटक (टी एस एस) ८.१० टक्के असला पाहिजे.
 7. काढणी आणि वाहतूक करताना फळांची कमीतकमी हाताळणी करावी. त्या करीता प्लॅस्टीक क्रेट्सचा वापर करावा.
 8. काढलेल्या आंब्याचा ढिगारा न करता आणि आदळआपट न करता ते पेटीत भरावेत. कारण आदळ आपट केल्याने आंब्याच्या आतील भागाला इजा होवून फळ पिकण्याऐवजी सडण्याची प्रक्रिया जास्त होते.
 9. उन्हात वाहतूक केल्यास हापूस आंब्यामध्ये साक्याचे प्रमाण
 10. प्री-कुलींगला योग्य प्रकारे आल्यानंतर बॉक्सेसची मांडणी ११0 से.मी. x ८0 सें.मी. × १३ सें.मी. लाकड़ी प्लेंटफॉर्मवर करून त्यास आवेष्टीत करावे. कोल्ड स्टोअरेजचे तापमान १२.५ अंश से. ग्रे. ठेवावे.
 11. खालील द्रावणात आंबे पाच मिनिटे बुडवून ठेवावेत. आंबा फळे पिकताना कुजू नयेत म्हणून फळांना कार्बन्डॅझिमची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यासाठी १o लिटर पाण्यात १0 ग्रॅम काबॅन्डॅझिमचे द्रावण घेऊन प्रक्रिया करावी. त्यात बिनडागी, न कुजलेले, १४ आणे तयार झालेले व वजनानुसार प्रतवारी केलेले आंबे ५ मिनिटे बुडवून ठेवावेत नंतर अमेरिकेस आंबा निर्यातीकरिता कृषि पणन मंडळाच्या पॅकहाऊसकडे आंबा उत्पादकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा नोंदणी केलेल्या आंबा उत्पादकांचा आंबा वि-किरण (इरॅडीकेशन) करण्याकरिता लासलगाव येथे सुविधा निर्माण केलेल्या आहेत. तेथे वि-किरण केल्यानंतरच आंबा फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्यात येते. सध्या फळे व भाजीपाला या पिकांची निर्यात प्रामुख्याने व्यापा-यांव्दारेच केली जाते. परंतू द्राक्ष, डाळींब, भाजीपाला व आंबा इ.

फळे व भाजीपाला उत्पादीत माल स्वत: शेतकरी निर्यात करण्याबाबत उत्सुक आहेत. त्याकरिता आंबा उत्पादक शेतक-यांनी द्राक्षाप्रमाणेच आंब्याची स्वतः निर्यात सुरू केल्यास निश्चित त्याचा फायदा आंबा उत्पादकांना होणार आहे.