सध्या अवकाळी पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे मोठे नुकसान होत आहे. पुण्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

कालपासून पुण्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पुढील चार दिवस महत्वाचे आहेत. पुण्यात रविवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे पुणेकरांच्या सुट्टीची धांदल उडाली.

काही वेळातच रस्ते पाण्याखाली गेले. हडपसरमध्ये काल १३.५ मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला. तर एनडीए १ मिमी, लोणावळा १, शिवाजीनगर ०.५, मगरपट्टा ०.५, हवेली ०.५ पावसाची नोंद झाली. उन्हाळ्यात दुपारी प्रचंड उकाडा आणि सायंकाळी पाऊस हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना अनुभवता येत आहे.

हवामान बदलल्याचा हा फटका असल्याची चर्चा केली जात आहे. येत्या तीन-चार तासांमध्ये पुणे शहरासह राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, धाराशिव, सिंधुदुर्ग येथेही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गारपीट देखील होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फटका शेतकऱ्यांना बसत आहे.