खानदेशात कापूस दर नीचांकी स्थितीत म्हणजेच प्रतिक्विंटल ७३०० ते ७४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आवक प्रतिदिन ८० हजार क्विंटलपर्यंत पोचली आहे. आवक वाढल्याने दर पातळी घसरली आहे.
या महिन्यात आवक अधिक वाढली आहे. एप्रिलमध्ये प्रतिदिन सरासरी ६८ हजार क्विंटल एवढ्या कापसाची आवक खानदेशात झाली. या महिन्यात मागील तीन ते चार दिवसांत आवक वाढली आहे. कारण पावसाळी वातावरण निवळले आहे. मजूरही कामावर परतले आहेत. कापूस प्रक्रिया कारखान्यांत वेगात काम सुरू आहे.
कापसाची गरज वाढली आहे. यामुळे खेडा खरेदी वाढली आहे. आवकही अधिक होत आहे. परिणामी, दरावर दबाव आणखी वाढला आहे. खानदेशात सध्या रोज १३ ते १४ हजार (एक गाठ १७० किलो रुई) गाठींची निर्मिती कारखान्यांत होत आहे. ही प्रक्रिया आणखी वेग घेईल. कारण कापसाची आवक व्यवस्थित होत आहे.