गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कादा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे यावर सरकारने लक्ष देण्याची मागणी केली जात होती. असे असताना आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, कांदा उत्पादनात भारत देश अग्रेसर असून जगभरातील कांद्याच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा २६ % आहे. भारतामध्येही सर्वाधिक उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशातील एकूण कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४३% आहे. सध्या बाजारातील लेट खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे.
लाल कांद्याची साठवणूक क्षमता मुळे देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढलं आहे. आणि ग्राहकांकडून आवश्यकतेनुसार कांद्याची खरेदी सुरु असल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे ही वस्तुस्थिती आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण एक समिती नेमली होती. या समितीत सर्वंकष निकष झाल्यांनतर त्यांनी प्रतिक्विंटल २०० किंवा ३०० रुपयांची शिफारस केली होती. त्यानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे. तसेच आमचं हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.