गहू हे भारतातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे.

 

जगातील गहू पिकाचे एकूण क्षेत्र व उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.

1964-65 मधील 122.6 लाख मे. टन उत्पादनापासून 2013-14 च्या रब्बी हंगामात 959.1 लाख मे. टनांपर्यंत पोचले आहे. आपला देश गहू उत्पादनात स्वयंपूर्ण होऊन निर्यातही करू लागला आहे. गहू उत्पादनात भारताने अमेरिकेलासुद्धा मागे टाकले आहे.

मात्र, भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रतिहेक्‍टरी गहू उत्पादकता कमी आहे. 2013-14 च्या रब्बी हंगामात सरासरी प्रतिहेक्‍टरी गव्हाचे उत्पादन हे भारत देशाचे 30.61 क्विंटल, तर महाराष्ट्र राज्याचे 15.21 क्विंटल होते.

गहू पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात उत्तर प्रदेश, तर प्रतिहेक्‍टरी उत्पादकतेत पंजाबचे स्थान नेहमीच अव्वल राहिले आहे.

 

गहू पिकाच्या पाण्याच्या पाळीसाठी संवदेनशील अवस्था. पेरणीनंतर दिवस ः

1) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था – 18 ते 21

2) कांडी धरण्याची अवस्था – 40 ते 45

3) फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था – 60 ते 65

4) दाणे भरण्याची अवस्था – 80 ते 85

 

पाण्याची उपलब्धता कमी असल्यास,

1) केवळ एकच पाणी देणे शक्‍य असल्यास – पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी द्यावे.

2) दोन पाणी देणे शक्‍य असल्यास – पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी व दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.

3) तीन पाणी देणे शक्‍य असल्यास – पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी व दुसरे पाणी 40 ते 42 दिवसांनी व तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.

अपुरा पाणीपुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी शक्‍य आहे अशा क्षेत्रात शक्‍यतो पंचवटी (एनआयडीडब्ल्यू 15) हा गव्हाचा वाण पेरावा.

 

आंतरमशागत

तणांचे नियंत्रण करण्यासोबतच आंतरमशागतीमुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

गव्हात चांदवेल, हरळी, दुधाणी, लव्हाळा इत्यादी तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. त्याकरिता एक किंवा दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी.

वरीलप्रमाणे बागायती गव्हाची वेळेवर लागवड केल्यास हेक्‍टरी 45 ते 50 क्विंटल, बागायती गव्हाची उशिरा लागवड केल्यास हेक्‍टरी 35 ते 40 क्विंटल व जिरायत लागवड केल्यास हेक्‍टरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते.