देशातील बाजारांत कापूस दरात पुन्हा सुधारणा दिसत आहे. मागील आठ दिवसांमध्ये कापसाची सरासरी दरपातळी सुधारलेली दिसते. तर आवकही कमी झाली. सोमवारी (ता. ५) काही बाजारांमध्ये कापसाला कमाल ८ हजारांचा दर मिळाला होता. तर कापसाची सरासरी दरपातळी ७ हजार ते ७६०० रुपयांच्या दरम्यान होती.
देशातील बाजारात कापूस दरात मागील आठवड्यापासून सुधारणा दिसत आहे. बाजारातील कापसाची आवक आता कमी झाली. मे महिन्यात कापूस आवक एक लाख गाठींपेक्षा अधिक राहिली. याचा दबाव दरावर आला होता. परिणामी कापसाच्या भावाने हंगामातील नीचांकी दर गाठला. Cotton Market
अनेक बाजारांत कमाल भाव ७ हजारांपेक्षा कमी झाले होते. खरिपातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कापसाची विक्री करत होते. दर कमी झाले तरी कापूस येत असल्याने व्यापारी आणि उद्योगांनी कापसाचे भाव आणखी पाडले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.
आता शेतकऱ्यांची खरिपाची गरज जवळपास भागली. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. आता खूपच कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. कापसाचे भाव मे महिन्यात कमी असताना अनेक शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग केले.
आता कापूस कमी आहे. तसेच भाव वाढल्याशिवाय हे शेतकरी कापूस बाहेर काढण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे भाव वाढत असल्याचे व्यापारी आणि जाणकारांनी सांगितले.
अकोटमध्ये कमाल दर ८१४० रुपये
मे महिन्यात १ लाख २० हजार ते १ लाख ३० हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होती. ती आता ७० ते ७५ हजारांवर आली. कापसाची आवक सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे दरातही सुधारणा पाहायला मिळते. ६ हजारांवर गेलेले कापसाचा किमान भाव आता ७ हजारांवर पोहोचला.
तर कमाल भावाने काही बाजारांमध्ये ८ हजारांचा टप्पा गाठला. सोमवारी अकोट बाजारात कापसाला कमाल भाव ८१४० रुपये मिळाल्याची माहिती मिळाली.
अर्थातच हा भाव सर्वच मालाला मिळाला नाही. लांब धाग्याच्या गुणवत्तापूर्ण कापासाल हा भाव मिळाला.
दर आणखी सुधारण्याचा अंदाज
यापुढील काळात कापसाची आवक आणखी कमी होत जाणार आहे. तसेच आता जास्त दिवस थांबू शकतील अशाच अगदी थोड्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. हे शेतकरी सध्याच्या भावात कापूस विकण्याची शक्यता खूपच कमी आहे.
त्यामुळे दरात आणखी सुधारणा दिसू शकते. तसेच यंदा पावसाचे प्रमाण कसे राहते आणि कापूस लागवड किती होते, यावरच कापसाचे भाव अवलंबून राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.