मागील काही तासांत राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस अद्यापही राज्यातील काही भागात अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता असून आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ हवामानासह (Weather) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकताटासह ढगांच्या गडगडाटाट अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यातील बागलाण, सटाणा, येवला, लासलगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आदी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांना अवकाळीचा जोरदार फटका बसला असून आहे. दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज नाशिकसह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या दाजानुसार सह मार्च रोजी दुपारी दीड वाजेनंतर पुढील तीन ते चार तासांत पालघर, ठाणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील 3 ते 4 तासांत विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकसह जिल्ह्यात येत्या तीन चार तासांत पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.

नाशिकसह ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस

दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज नाशिकसह धुळे बुलढाणा आणि पालघर जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात बदल झाला असून ढगाळ वातावरण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे मका, पपई, केळी आणि उशिरा लावलेल्या गहू, हरभरा या पिकांवर काही प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.