देशातील बाजारात रब्बी हंगामातील कांदा आवक वाढत आहे. पण कांद्याला पावसाचा फटका बसत आहे. देशभरातील कांदा उत्पादक पट्ट्यात पाऊस पडत आहे. ऐन कांदा काढणीच्या काळात पाऊस दणका देत असल्याने कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय.
कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचा फटका दराला बसतो. पाणी लागलेल्या कांद्याची टिकवणक्षणता कमी होते. काही ठिकाणी तर जमिनित ओलावा जास्त असल्याने काढणीच्या कामात अडचणी येत आहेत. कांदा काढणी ठप्प होत आहे. तर अनेक ठिकाणी शेतात काढणी केलेला कांदा पावसात भीजत आहे.
हा कांदा बाजारात लवकर विकण्याची घाई शेतकरी करत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक जास्त आहे. तसेच यापैकी गुणवत्ता कमी असलेल्या कांद्याला भावही कमी मिळत आहे. सध्या देशपातळीवर कांदा दराची सरासरी ८०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. सध्याचा भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
खरिप कांद्यालाही यंदा कमी भाव मिळाला होता. खरिपातील हा तोटा रब्बी हंगामात भरुन निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण सध्या तरी कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव आहे. कांदाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याने हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांद्याची मोठी टंचाई भासेल, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.