राज्यात उन्हाचा (Heat) चटका पुन्हा वाढू लागला आहे. अकोला, सोलापूर मध्ये पारा चाळीशीपार गेला आहे. यातच मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिट (Hailstorm) झाली आहे.
आज (ता. २७) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाबरोबरच गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Hailstorm Orange Alert) देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यता कायम हवामान विभागाने वर्तविली आहे. Weather Forecast
पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. पश्चिम विदर्भापासून, उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंची दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.
मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज (ता. २७) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. Hailstorm
राज्यात कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडाही कायम आहे. बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तर सोलापूर येथे ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. Weather Update
बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३८.३ (२२.२), नगर ३८.४ (२९.०), जळगाव ४०.५ (२५.२), कोल्हापूर ३६.५ (२२.६), महाबळेश्वर ३१.२ (१६.४), नाशिक ३७.८(२२.४),
निफाड ३९.५(२२.५), सांगली ३७.६ (२२.३), सातारा ३७.६ (१९.५), सोलापूर ४०.० (२४.०), सांताक्रूझ ३३.० (२७.०), डहाणू ३४.२ (२५.५), रत्नागिरी ३२.५ (२४.३),
छत्रपती संभाजीनगर ३८.२ (२१.०), नांदेड ३६.८ (२०.४), परभणी ३७.३ (२२.८), अकोला ४०.३ (२२.०), अमरावती ३६.८(२०.३), बुलढाणा ३७.० (२२.०), ब्रह्मपूरी ३७.४ (२३.१),
चंद्रपूर ३२.८ (२०.४), गडचिरोली ३४.४(२२.८), गोंदिया ३६.५ (२१.७), नागपूर ३५.४ (२१.५), वर्धा ३८.०(२१.९), यवतमाळ ३८.० (१९.०).
वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
नाशिक, नगर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी,
मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर.
विदर्भ : बुलढाणा, अमरावती, वाशीम, अकोला, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.