नमस्कार द्राक्षबागायतदार बंधुनो,
भुरी रोग (पावडरी मिल्ड्यू) हा ॲस्कोमायसिटीज वर्गातील एरिसायफेलीझ गणातील एरिसायफेसी कुलातील कवकांमुळे होणारा कवकजन्य रोग आहे.
भुरी हा रोग द्राक्षे, वाटाणा, काकडी, गहु यांप्रमाणे अनेक पिकांवर विशेषत्वाने आढळून येतो. विशेषतः समशीतोष्ण हवामानात हा रोग अनेक वनस्पतीवर आढळून येतो. या रोगात पोषकाच्या पृष्ठभागावर पांढरट करड्या रंगाची संगजिऱ्याच्या पुडीप्रमाणे दिसणारी वाढ दिसून येते आणि त्यात कवकजाल, विबीजुकदंड, रंगहीन विबीजुके व कवकजालात विखुरलेले काळ्या रंगाचे युक्तधानीफल [कवक] यांचा समावेश असतो. पावडरी भुरी रोगाची सर्व कवके सदापरजीवी असतात. काही अपवाद वगळता त्यांचे शोषक भाग पोषकाच्या बाह्यत्वचेतील कोशिकांत आढळून येतात परंतु त्यामुळे बाह्यत्वचेला इजा झाल्याचे दिसून येत नाही. विबीजुके साखळीत असतात. वाऱ्यामुळे ती अलग होतात व दूर अंतरावर वाहुन नेली जातात व अशा तऱ्हेने रोगाचा प्रसार होतो.

पृष्ठभागावरील कवकाच्या वाढीमुळे सूर्यप्रकाश पोषकाच्या पृष्ठभागापर्यंत पोहचत नाही व त्यामुळे प्रकाशसंश्लेषणाच्या (सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करून कार्बन डायऑक्साइड व पाणी यांसारख्या साध्या संयुगापासून कार्बोहायड्रेटांची निर्मिती करण्याच्या) कार्यात व्यत्यय येतो. रोगट पाने पुष्कळ आठवड्यांपर्यंत टिकून राहतात व त्यांत ऊतकमृत्यूची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांच्या मृत्यूची ) लक्षणे आढळून येत नाहीत.
एरिसायफेसी कुलातील पुढील महत्त्वाच्या वशांतील कवकांमुळे पावडरी भुरी रोग उद्भवतात : (१) स्फेरोथेका (२) पोडोस्फीरा (३) एरिसायफे (४) फायलॅक्टिनिया (५) मायक्रोस्फिरा व (६) अन्सिन्यूला

युक्तधानीफलांवर निरनिराळ्या प्रकारची उपांगे असतात त्यांवरुन आणि धानीफलांतील धानीच्या संख्येवरुन विशिष्ट वंशाची ओळख पटते. धानीफले फुटून त्यांतून धानी मोकळ्या होऊन त्यांतून धानीबीजुके बाहेर पडतात व ती लैंगिक बीजुके असतात. त्याद्वारे पावडरी भूरी रोगांचा प्रसार होतो. द्राक्ष पिकांवर हा रोग सर्वात जास्त नुकसानकारक आहे आणि त्या पिकावर तो डाऊनी भुरीपेक्षाही जास्त नुकसानकारक आहे असे मानण्यात येते.

भारतातच नव्हे, तर जगात सर्वत्र हा रोग द्राक्षावर आढळून येतो आणि रोगाच्या वाढीला पोषक असे हवामान असल्यास तो मोठ्या क्षेत्रावर झपाट्याने पसरतो. उबदार व बेताचे कोरडे हवामान या रोगाला पोषक असते. रोगाची सुरुवात लवकर झाल्यास पिक फळे धरत नाहीत आणि उशीरा (फळे पोसण्याच्या हंगामात) सुरुवात झाल्यास फळे आकारमानाने लहान (पोसत नाहीत) व वेडीवाकडी होतात व त्यांतील फारच थोडी पिकतात.

थंड आणि कोरडे वातावरण हे भुरी रोगाच्या वाढीसाठी पोषक आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला जुन्या किंवा बुंध्याजवळील पानांवर होतो. द्राक्षावरील पावडरी भुरी रोगांचा प्रसार हा पुढील मार्गाने होतो : (१) रोगट खोड, (२) रोगट पान, (३) रोगट फळ याद्वारे होतो.
भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास द्राक्ष झाडाच्या पानांवर, फुलकळी तसेच देठावर भुरकट रंगाचे बुरशीचे ठिपके दिसून येतात. कालांतराने ती पाने पिवळी पडून गळून जातात. तसेच प्रकाशसंश्लेषन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. भुरी रोगाचा प्रादुर्भाव द्राक्ष, मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, वेलवर्गीय पीक तसेच विविध फुलपिके आणि फळपिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे भुरी रोगाचे वेळीच एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे.

यासाठी पुढील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
द्राक्ष पिकास पोटॅश या अन्नद्रव्यांची कमी पडल्यास पीक भुरी रोगाला लवकर बळी पडते त्यामुळे द्राक्ष बागेत सुरुवातीच्या काळापासून नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित प्रमाणात करून पोटॅश आणि कॅल्शिअम युक्त खतांचा वापर वाढवावा जेणेकरून द्राक्ष पीक भुरी आणि इतर रोगांना बळी पडणार नाही.

A) भुरीच्या परिणामकारक नियंत्रणासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील.:-
अ)) द्राक्ष मण्यांवर व पानांवर भुरी येते :-
१) पानांवर भुरी आल्यावर पानांचा अन्ननिर्मितीचा वेग कमी होतो व पानांचा टिकाऊपणा कमी होऊन पाने लवकर खराब होतात. परिणामी एकरी वजनात घट येते.
२) मण्यांवर भुरी आल्यावर फुगवण कमी होते व दुय्यम दर्जाचा माल तयार होऊन नुकसान होते.
भुरी प्रतिबंधात्मक उपाय हीच भुरी नियंत्रणाची सर्वांत योग्य पद्धत. एकदा आलेली भुरी नियंत्रित करण्यास अवघड असते. भुरी नियंत्रित झाली की नाही हे उघड्या डोळ्यांनी बघून ठरवणे तसे अवघडच असते.

B) भुरी नियंत्रणाकरिता पुढील बाबी महत्त्वाच्या :-
१) भुरी येण्याचा कालावधी :-
फळछाटणीनंतर २० ते २५ दिवसांपासून अनुकूल हवामान असल्यास भुरी येण्यास सुरवात होते, तर मण्यात पाणी फिरेपर्यंत भुरी येते. नानासाहेब पर्पल, शरद, जम्बो या द्राक्ष जातीत तर मण्यात पाणी फिरल्यावरही मण्यांच्या देठावर भुरी येते.
२) भुरीसाठी अनुकूल हवामान :-
अ) १३ अंश सेल्सिअस तापमान व ५० टक्के आर्द्रता या वातावरणात भुरीची सुरवात होते.
ब) २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमान व ६० ते ७० टक्के आर्द्रता या हवामानात भुरी मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
क) आलेली भुरी ढगाळ हवामानात कोणत्याही तापमानाला वाढते, तसेच ३६ व त्यापुढील तापमानामध्ये व आर्द्रता ९८ टक्‍क्‍यांच्या पुढे व ४० टक्‍क्‍यांच्या आत असल्यास भुरी येत नाही.

C) सतत निरीक्षण महत्त्वाचे :-
१) सतत पानांचे व मण्यांचे निरीक्षण करणे महत्त्वाचे असते.
२) पानांवर भुरी शक्‍यतो वरील बाजूने येत असली तरी काही वेळेस मागील बाजूने येते.
३) बागेत जिथे सतत व जास्त ओलावा असतो, तेथून भुरी वाढण्यास सुरवात होते.
४) ज्या पानांवर दिवसभरात कधीही ऊन पडत नाही, अशा तळातील पानांवर सर्वात आधी लवकर भुरी येते. त्याचप्रमाणे मांडवाच्या वरील फवारणी द्रावण कमी पोचणाऱ्या मण्यांवर व पानांवर भुरी लवकर येते.

D) भुरी नियंत्रणाकरिता फवारणीची सुरवात :-
१) हवामानानुसार छाटणीपासून २० ते २५ दिवसांनी भुरी नियंत्रणाकरिता फवारणीची सुरवात केली पाहिजे.
२) हवामानानुसार दर ६ ते १० दिवसांनी प्रतिबंधात्मक फवारणी केली पाहिजे.

E) फुलोऱ्यात हे आवश्‍यक असते :-
१) फुलोऱ्यामध्ये भुरी नियंत्रणाकरिता आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा.
२) फुलोऱ्याच्या आतच भुरी घडावर आल्यास भुरी नियंत्रित करणे अवघड जाते.
३) मणी ६ ते ७ मि.मि. आकाराचे होईपर्यंत भुरी नियंत्रणाकरिता केलेल्या फवाऱ्याचे कव्हरेज चांगले मिळते. यानंतर पुढील काळात मणी मोठे झाल्याने फवारणीचे कव्हरेज मिळत नाही म्हणूनच मणी ६ ते ७ मिमी होईपर्यंत भुरी नियंत्रित ठेवली पाहिजे व पुढील काळात मण्यात पाणी भरेपर्यंत भुरी नियंत्रणाचे फवारे घेतले पाहिजेत.

F) भुरी रोगांचे एकात्मिक नियंत्रण :-
अ) जैविक पद्धतीने नियंत्रण :-
भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला जैविक पद्धतीचा अवलंब करावा. जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी एएमपी (अँपेलोमायसेस क्विस्क्वालिस) (Ampelomyces quisqualis) किंवा ट्रायको (ट्रायकोडर्मा व्हिरिडी) (Trichoderma Viride) या जैविक उत्पादनाचा वापर भुरी रोगांच्या नियंत्रणासाठी ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणीसाठी तर ५ ते १० मिली आळवणीसाठी करावा. याप्रमाणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा पिकात फवारणी करावी. अँपेलोमायसेस क्विस्क्वालिसची बुरशी भुरी रोगाच्या बुरशीवर उपजीविका करते त्यामुळे रोग नियंत्रणास तसेच प्रतिबंधास मदत होते.

ब) सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण :-
फंगीनिल १ ते २ मिली आणि निमकरंज १ ते २ मिली आणि स्टीकोस्प्रेड ०.५ ते १ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. कीड आणि रोगांच्या विरोधी लढण्याची क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन १ मिली प्रति लिटर तसेच कायनेटिन घटक असणारे कीटोगार्ड २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फुलोरा अवस्थेपूर्वी २ वेळा फवारणी करावी.

क) रासायनिक नियंत्रण :-
शेवटच्या टप्प्यात रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करावा.
१) भुरी नियंत्रणाकरिता फवारणीची सुरवात फळछाटणीनंतर २० ते २५ दिवसांनी केली पाहिजे.
२) सुरवातीस कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
३) त्यानंतर ३० दिवसांदरम्यान हेक्‍झाकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे एकच फवारणी करावी. (त्याचा पीएचआय ६० दिवसांचा आहे.)
४) यानंतर पुढे फुलोरा अवस्थेमध्ये डायफेनकोनॅझोल (२५% ईसी) ०.५ मिलि प्रति लिटर पाण्यास फवारणे. नंतर ६ ते ७ दिवसांनी पुन्हा एक स्प्रे द्यावा. याचे गरजेनुसार तीन स्प्रेही चालतील. (याचा पीएचआय ४५ दिवसांचा आहे.)
५) यानंतर दिवसाचे तापमान २५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास ६ दिवसांच्या अंतराने एक ते दोन स्प्रे सल्फर (८०% डब्लूजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
६) यानंतर टेट्राकोनॅझोल (३.८% ईडब्ल्यू) १५० मिली प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (याचा पीएचआय ३० दिवसांचा आहे.)
७) यानंतर शेवटी मायक्‍लोबुटॅनील(२०% डब्ल्यूपी) ८० ग्रॅम प्रति २०० लिटर या प्रमाणात फवारावे. याचे आपण २ – ३ स्प्रे घेऊ शकतो. (याचा पीएचआय ३० दिवसांचा आहे. २ ते ३ स्प्रेमुळे अंदाजे पीएचआय ४० दिवसांचा गृहीत धरावा.)

G) भुरी नियंत्रणाकरिता पोटॅशिअम बायकार्बोनेटचा वापर :-
१) टेट्राकोनॅझोल, मायक्‍लोबुटेनिल या बुरशीनाशकासोबतच २.५ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात पोटॅशिअम बायकार्बोनेटचा वापर फायदेशीर ठरतो.
२) गरजेनुसार एका हंगामामध्ये पोटॅशिअम बायकार्बोनेट ३ ते ४ वेळा वापरावे.
३) पानांत पोटॅशची कमतरता असल्यास भुरी नियंत्रणात येत नाही. या फवारणीने पानांतील पोटॅशची कमतरता भरून निघते व भुरीचे नियंत्रण मिळते.

H) अधिक भुरी प्रादुर्भावामध्ये करावयाची उपाययोजना :-
१) मणी ६ ते ७ मिमी पेक्षा मोठे झाल्यावर अनेक वेळा भुरी नियंत्रित होत नाही. अशा वेळी बुरशीनाशकांचे एकरी प्रमाण २५ टक्‍क्‍यांनी वाढवावे.
२) फवारणी द्रावण एकरी ८०० लिटर घेऊन चांगले फवारावे. (उदा. मायक्‍लोबुटॅनिल एकरी १६० ग्रॅम अधिक २५ टक्के जादा म्हणजे ४० ग्रॅम म्हणजे ८०० लिटर पाण्यात २०० ग्रॅम घेऊन फवारावे.)

वरील पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल तसेच रोग नियंत्रणास चांगली मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल. द्राक्ष पिकांमध्ये भुरी रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उत्पादनाचा दर्जा घटण्यासोबतच उत्पादनामध्येही घट होते. त्यामूळे वेळीच नियंत्रण केल्यास उत्पन्नात वाढ होते.

टीप:- आपल्या द्राक्ष बागेतील माती, पाणी, पान, देठ आणि काडी परिक्षण अहवाल नोंदी लेखनापासुन खत, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दररोजच्या नोंदी ठेवण्यासाठी तसेच द्राक्ष बागेतील अन्नद्रव्य व रोग-कीड व्यवस्थापन माहितीसाठी व कमीत कमी खर्चात एक्सपोर्ट दर्जाच्या द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष नोंदवहीचा वापरा करावा…

फळछाटणी संदर्भात पुढील सविस्तर माहिती क्रमशः


🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
General Manager,
DevAmrut Agrotech Private Limited
Mob No.: 09762064141
FB Link: https://www.facebook.com/sp.bhosale2151
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇