जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण सल्याने बेदाणा निर्मितीस अडचणी येऊ लागल्या आहेत. परिणामी बेदाणा तयार होण्यास विलंब लागत आहे. यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील नागज परिसरात बेदाणा निर्मितीची शेड उभी आहेत. गेल्या महिन्यापासून बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू आहे. पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होत आहे. बेदाणा हंगाम मध्यावर आला आहे. सुमारे तीन ते चार हजारांहून अधिक बेदाणा शेडवर बेदाणा तयार करण्याची लगबग सुरू आहे.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बहुतेक भागात हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ढगाळ वातावरणामुळे बेदाणा काळपट होणे, दर्जा घसरणे, आणि बेदाणा तयार होण्यासाठी विलंब होणे या साऱ्यांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच पाऊस पडला तर बेदाण्याचे नुकसान होईल या भीतीने बेदाणा तयार करण्यासाठी नियोजनात बदल करत असल्याचे चित्र आहे.

वातावरणात बदल झाल्याने बेदाणा तयार होण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, काही प्रमाणात दर्जाही घसरत आहे.