सध्या लम्पी आजारामुळे बंद केलेले जनावरांचे बाजार पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी, गोपालक व व्यापारी यांनी पशुसवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. मागील तीन महिन्यांपासून लम्पी या आजारामुळे जनावरांचे बाजार, यात्रा, जत्रा पशुसंवर्धन विभागाने बंद केल्या. सध्या मात्र लम्पीचा प्रादुर्भाव कमी असणार्‍या परिसरामध्ये यात्रांना परवानगी मिळाली आहे. मात्र, अजूनही जनावरांच्या बाजाराला मात्र परवानगी मिळालेली नाही.

त्यामुळे ज्या परिसरात लम्पीचा प्रादुर्भाव कमी आहे अशा परिसरात बैल, गाय, शेळ्यांचे बाजार पुन्हा पूर्ववत सुरू करावेत अशी मागणी मंचर येथील बैलगाडा मालक के. के. थोरात आणि व्यापारी व शेतकरी करत आहेत. प्राण्यांचे बाजार बंद असल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात लम्पीचा प्रादुर्भाव कमी आहे, त्यामुळे जनावरांचे बाजार पुन्हा एकदा सुरू करावेत. जेणेकरून शेतकर्‍यांना आपली जनावरे बाजारात विकता येतील, असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या बाजार बंद असल्याने जनावरांची खरेदी- विक्री थांबली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांना जनावरे विकायची आहेत, त्यांना मागील तीन ते चार महिन्यांपासून जनावरांना चारा-पाणी करून सांभाळावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक खर्च वाढत चालला आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना नवीन जनावरे शेती कामासाठी, शर्यत, दूध धंद्यासाठी खरेदी करायची आहेत, त्यांना जनावरे खरेदी करता येत नाहीत.

परिणामी विक्रेता व ग्राहक या दोघांचीही अडचण सध्या झाल्याचे बैलगाडा मालक जयसिंगराव एरंडे यांनी सांगितले. जनावरांच्या बाजारावर अनेक लोकांचे प्रपंच उभे आहेत. यामध्ये व्यापारी, शिंगे साळनार, दावे मोरखी बनवणारे, हॉटेलवाले, गाडी वाहतूकदार, या सर्वच लोकांना मिळणारा आर्थिक रोजगार बंद झाला आहे.

लम्पीची लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहून जनावरे सोडा
लम्पीमुळे बाजार सध्या बंद आहे. बाजार सुरू केल्यास लम्पीचा प्रादुर्भाव वाढेल अशी भीती शासनाच्या मनात आहे. त्यासाठी गाई, बैल बाजारात विक्रीसाठी आणणार्‍या शेतकर्‍यांकडून लम्पीची लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासूनच बाजारात प्रवेश द्यावा, अशी मागणी मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंत बाणखेले यांच्यासह शेतक-यांनी केली आहे.