ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना मोठा फटका बसत आहे. वातावरणामुळं गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय.
बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण आहे. तर कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. सध्या असलेल्या ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना मोठा फटका बसत आहे. वातावरणामुळं गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
ढगाळ वातावरणामुळं हिंगोली जिल्ह्यातील गुलाब उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण गुलाबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दुसरीकडं दमट वातावरणामुळं अचानक गुलाबाच्या उत्पादन चार पटीनं वाढ झाली आहे. यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणावर गुलाबाच्या फुलांची आवक सुरु झाली आहे. याचा परिणाम बाजार भावावर होत आहे. सध्या गुलाबाचे दर घसरले आहेत.
रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पुढील बहरात गुलाबाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार
हिंगोली जिल्ह्यातील धानोरा येथील गुलाब शेतीचे उत्पादन घेणारे शेतकरी पांडुरंग राऊत यांनी त्यांच्या शेतात दोन एकर शेत जमिनीवर चार वर्षापूर्वी गुलाबाची लागवड केली आहे. गुलाबाची झाडे मोठी झाल्यानं गुलबाच्या फुलांचे चांगले उत्पन्न देखील त्यांना मिळत आहे. परंतू, मागील आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानं या गुलाब फुल शेतीला मोठा फटका बसत आहे. दमट वातावरणामुळे अचानक गुलाबाच्या फुलांचे उत्पादन वाढले आहे तर दुसीरकडं बाजारात फुलांची आवक वाढल्यानं फुलांचे भाव घसरले आहेत. अशातच ढगाळ वातावरणामुळं तयार असलेल्या गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. गुलाबावर करपा रोगाचा, किड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं गुलाबाच्या पुढील बहरात उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता
राज्यात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी तर अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. दरम्यान आजपासून पुढील तीन दिवस हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील बिकानेर, चुरू झुंजनू, हनुमानगड जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून, तिथे थंडीची लाट येण्याची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे पुढच्या तीन दिवसांनतर म्हणजे सोमवारपासून (19 डिसेंबरपासून) महाराष्ट्रासह गुजरातमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.