राज्य सरकारच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेस शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद असून, सहभागी शेतकर्यांची सोडत जाहीर झाली आहे. राज्यातील 21 हजार 211 शेतकर्यांची निवड लॉटरी पद्धतीने झाली असून, त्यासाठी 121 कोटी 49 लाख रुपयांची गरज लागणार आहे. त्यातून सुमारे 35 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नव्याने फळझाडे लागवड होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकारने फळबाग लागवड योजनेसाठी 104 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान मंजूर असून, उर्वरित रक्कमही दिली जाईल. फुंडकर फळबाग लागवड योजनेत शेतकर्यांच्या सहभागासाठी 30 नोव्हेंबर ही अखेरची तारीख होती. त्यानुसार आर्थिक लक्षांकाच्या अधीन राहून जिल्हानिहाय एकत्रित लॉटरी काढण्याची कार्यवाही महाआयटीमार्फत करून शेतकर्यांची निवड करण्यात आली. कोकण विभागात 10 गुंठे ते 10 हेक्टरपर्यंत, तर उर्वरित विभागात 20 गुंठे ते 6 हेक्टर क्षेत्रापर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
योजनेमध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजिर, चिकू इत्यादी फळझाडांची लागवड करता येते. तर फळझाडे लागवडीसाठी खड्डे खोदणे, कलमे-रोपांची लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे आदी कामे योजनेतून शंभर टक्के अनुदानावर केली जातात.
सोडतीमध्ये निवड झालेल्या शेतकर्यांनी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केल्यानंतर छाननीनंतर संंबंधितांना योजनेसाठी पूर्वसंमती देण्यात येईल. त्यादृष्टीने संबंधितांनी तत्काळ कार्यवाही करून कामे सुरू करणे अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालनालयातून देण्यात आली.