खानदेशात केळी दरात काहीशी नरमाई मागील सहा ते सात दिवसांपासून दिसत आहे. खोडवा किंवा पिलबाग केळीत काढणी बऱ्यापैकी होत आहे. सध्या केळीस कमाल २५०० तर किमान १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. निर्यातीची  किंवा दर्जेदार केळीची आवक कमी आहे.

केळीची परदेशातील निर्यात अद्यापही प्रतिदिन चार कंटेनर, (एक कंटेनर २० टन क्षमता) अशीच आहे. जळगाव जिल्ह्यात दोन, धुळ्यात एक व नंदुरबारात एक कंटेनर निर्यातीच्या केळीसंबंधी उपलब्ध होत आहे. स्थानिक बाजारात केळीची मागणी कमी आहे. पण केळीची आवकही कमी असल्याने दरात मोठी घसरण किंवा दबाव नाही.

परंतु केळीचे कमाल दर २६०० ते २८०० रुपयांवरून २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. तर किमान दर २००० रुपयांवरून १९००, १८०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. निर्यातीच्या केळीची काढणी रखडत सुरू आहे. उष्णता वाढली आहे. परंतु विषम वातावरण कायम आहे. वातावरणातील उष्णता, कोरडे वातावरण व निरभ्र स्थिती याची अपेक्षा आहे.

सध्या खानदेशात प्रतिदिन ७० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. एवढीच आवक मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व लगत होत आहे. तेथेही कमाल दर २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. उत्तर भारतात केळीची मागणी आहे.

तेथील काही खरेदीदार जळगाव, धुळे जिल्ह्यातील एजंटकडे मागणी नोंदवीत आहेत. परंतु केळीची हवी तेवढी काढणी, आवक सुरू नसल्याने संबंधित मंडळी पुरवठा करू शकत नसल्याचे दिसत आहे.

सध्या मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा व धुळ्यातील शिरपूर भागात पिलबाग केळीमधून आवक होत आहे. नंदुरबारात शहादा, तळोदा भागात काही आगाप नवती बागांमधून केळीची काढणी सुरू आहे. या केळी उत्पादकांना चांगले दर निर्यातीसंबंधी मिळत आहेत.