शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे पदार्थ, लहान आतड्यापासून शस्त्रक्रियेत टाके घालण्यासाठी दोरा (कॅट गट), हाडांपासून खत, खनिज मिश्रण, कातडीपासून उच्च प्रतीचे चामडे मिळते. काश्‍मिरी जातीच्या शेळ्यांकडून “पश्‍मिना’ नावाची मऊसूत लोकर मिळते. अंगोरा जातीच्या शेळ्यांपासून “मोहेर’ नावाची लोकर मिळते.

देशातील जाती

1) हिमालयीन पर्वत रांगा ः (जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचल) जाती ः गुड्डी, चेगू आणि चांगाथांगी इ.
2) उत्तर-पश्‍चिम विभाग ः (हरियाना, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाचे उत्तर – पश्‍चिम भाग) जाती ः बिटाल, कच्छी, झालवाडी, सुरती, मेहसाणा, गोहिलवाडी, मारवाडी, सिरोही, जखराना, बारबरी, जमनापारी इ.
3) दक्षिण विभाग ः (महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशाचे काही भाग) जाती ः उस्मानाबादी, कन्नी अडू, मलबारी, संगमनेरी इ.
4) पूर्व विभाग ः (बिहार, पश्‍चिम बंगाल, ओरिसा आणि ………..भारताचा उत्तर-पूर्व विभाग) जाती ः काळी बंगाली, गंजाम इ.

आकारमानानुसार वर्गीकरण ः

1) मोठ्या आकाराच्या शेळ्या ः जमुनापारी, बिटाल, जखराना, झालवाडी, सिरोही इ.
2) मध्यम आकाराच्या शेळ्या ः मारवाडी, कच्छी, सुरती, बारबरी, मेहसाणा, गोहीलवाडी, कन्नीअडू, मलबारी, संगमनेरी, उस्मानाबादी, गंजाम, चांगाथांगी, चेगू आणि गुड्डी इ.
3) लहान आकाराची शेळी ः काळी बंगाली.

शेळ्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनानुसार शेळ्यांचे प्रकार

1) दूध व मांस (दुहेरी उद्देश) ः जखराना, जमुनापारी, बिटाल, झालवाडी, गोहीलवाडी, मेहसाणा, कच्छी, सिरोही, बारबरी, संगमनेरी, मारवाडी इ.
2) मांसोत्पादनासाठी ः काळी बंगाली, उस्मानाबादी, गंजाम, मलबारी, कन्नीअडू इ.
3) मांस व लोकर उत्पादनासाठी ः चांगाथांगी, चेगू, गुड्डी इ.राज्यांत संगमनेरी व उस्मानाबादी या जाती प्रचलित असल्या तरी खानदेशातील काठेवाडी, खानदेशी, कोकणातील कन्याळ, पाटण तालुक्‍यातील कुई या जाती दूध व मांसासाठी उत्तम असूनही त्यांचे गुणधर्म निश्‍चित झालेले नाहीत.
भारतात केल, खागणी, बिरारी, चोरखा, दख्खनी, जौनपुरी, कन्नी, वेलाडू, कोदीवली, मालकणगिरी, नागमेसेहिल, ओरिसा ब्राऊन, पंतजा, पर्बतसर, रामधन, शेखावती, शिंगारी यांसारख्या कितीतरी जाती दुर्लक्षित राहिल्या आहेत.

शेळ्यांची वैशिष्ट्ये

अ) या जाती कोणत्याही प्रकारच्या हवामानात तग धरू शकतात.
ब) मुख्य पिकांपासून मिळणाऱ्या उपप्रकारच्या उत्पादनावर शेळ्या सहजगत्या तग धरू शकतात.
क) निकृष्ट प्रकारच्या खाद्याचे, गवताचे आणि अपारंपरिक खाद्याचे दूध, मांस आणि कातडीमध्ये रूपांतर उत्तम पद्धतीने करतात.
ड) शेळ्या सेंद्रिय पद्धतीने पालनास उपयुक्त असून, सर्वसाधारण रोगांना सहजासहजी बळी पडत नाहीत.
इ) शेळ्या दूरवर रानात, डोंगरकपाऱ्यांत चरण्यास जाऊ शकतात, तसेच कमीत कमी भांडवली गुंतवणुकीत व्यवस्थापन करणे सहज शक्‍य असते. कोणत्याही वातावरणाशी समरस होण्याची नैसर्गिक क्षमता असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या निवाऱ्याची गरज नसते.