खानदेशात पांढऱ्या प्रकारातील मोठ्या काबुली हरभऱ्यास नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर  आहे. तसेच लहान प्रकारातील पांढऱ्या काबुली हरभऱ्यास कमाल साडेसहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यास खानदेशात डॉलर किंवा मेक्सिको असेही म्हटले जाते. त्यातील लहान आकाराच्या पांढऱ्या काबुलीस व्ही टू म्हटले जाते. या दोन्ही हरभऱ्यांचे दर यंदा बऱ्यापैकी आहेत.

मोठ्या काबुली हरभऱ्याची पेरणी खानदेशात जळगावमधील रावेर, चोपडा, यावल, जामनेर, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील शहादा भागात केली जाते. केळीसाठी बेवड आणि कापणी पूर्ण झालेल्या केळी पिकात त्याची लागवड डिसेंबरमध्ये केली जाते. हा हरभरा अलीकडेच पक्व झाला आहे. काही भागांत त्याची मळणी झाली आहे. तर काही भागांत मळणी अपूर्ण आहे.

पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांनी त्याची कापणी व मळणी अनेक भागात टाळली आहे. परंतु मार्चच्या अगदी सुरवातीलाच ज्यांच्या हरभऱ्याची मळणी पूर्ण झाली, त्या शेतकऱ्यांना सध्या सुरुवातीच्या दरांचा लाभ होत आहे. किमान नऊ व कमाल साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर त्यास आहे.

जळगाव जिल्ह्यात फक्त अमळनेर व चोपडा या भागांत त्याची आवक अधिक आहे. नंदुरबारमधील नंदुरबार बाजार समितीतही काही प्रमाणात आवक होत आहे. परंतु कमाल खरेदीदार थेट खरेदी किंवा शिवार खरेदी करीत आहेत. कारण त्याची पेरणी खानदेशात फक्त १५ ते १६ हजार हेक्टरवर केली जाते.

जळगाव जिल्ह्यात अधिकची पेरणी केली जाते. इतर भागांत पेरणी कमी असते. यातील लहान व मोठ्या काबुलीस उठाव आहे. अमळनेर व चोपडा येथे रोज मिळून सुमारे २०० ते २५० क्विंटल आवक होत आहे.

मध्य प्रदेश, गुजरातमधील खरेदीदारांकडून त्यास उठाव आहे. लहान काबुलीचे दरही यंदा टिकून आहेत. काही शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळाला आहे.