देशात उत्तर भारतातील कापूस लागवड यंदा स्थिर आहे. परंतु देशात इतरत्र लागवड कमी होईल, असे दिसत आहे. देशात मागील हंगामात १२९ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा ही लागवड १२६.५० लाख हेक्टरपर्यंत राहू शकते, असाही अंदाज आहे.
यातच उत्तर भारतातील कापूस पिकाला अतिपावसाचा फटका बसला आहे. पंजाब, हरियानामध्ये कापूस पिकाचे ४० ते ४५ टक्के नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात मागील किंवा २०२२-२३ मध्ये कापूस लागवड ४२ लाख हेक्टरवर झाली होती.
मागील वर्षी राज्यात १८ जुलैअखेर ३८ लाख ७८ हजार हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली होती. यंदा १८ जुलै अखेर ३८ लाख ३३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड राज्यात झाली आहे.
त्यात काहीशी घट होवून लागवड ४० लाख हेक्टरवर स्थिरावेल, असे दिसत आहे. लागवडीचे आकडे येतच आहेत. परंतु लागवडीची मुदत महाराष्ट्र व इतर भागात संपली आहे. १५ जुलैपर्यंत राज्यात कोरडवाहू कापूस लागवड झाली आहे.
तेलंगणातही जुलैच्या मध्यापर्यंतच लागवड झाली आहे. तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटकातील ९५ टक्के कापसाखालील क्षेत्र कोरडवाहू असते. तर फक्त पाच टक्के क्षेत्राला सिंचनाची व्यवस्था आहे. पाऊस उशिरा आल्याने महाराष्ट्रातील लागवडीला फटका बसला आहे.
राज्यात सर्वाधिक कापूस लागवड जळगाव जिल्ह्यात केली जाते. जिल्ह्यात यंदा साडेपाच लाख हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित होती. परंतु ही लागवड १५ जुलैपर्यंत चार लाख ४५ हजार हेक्टरवर झाली आहे. ही लागवड यंदा कमीच राहील, असेही संकेत आहेत.