पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा  निवडणुकांचे थेट वेळापत्रकच सांगितले. तसेच कार्यकर्त्यांना त्यानुसार काम करण्याच्या सूचनाही दिल्या. कार्यकर्ता मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे आहे. मी काही भविष्यवाला नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रांगेने महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होतील.

न्यायालयाने काही नवीन रचना मांडल्यास त्यानुसार कामकाज करून नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुका होतील. त्यानंतर ज्या निवडणुका चुकतच नाहीत, अशा लोकसभा निवडणुका मार्चमध्ये घोषित होऊन सहा टप्प्यात होतील. ती प्रक्रिया मे अखेरपर्यंत चालेल. त्यानंतर चुकतच नाही अशी विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल.त्यामुळे महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूका मिळून यंदाचे वर्षे निवडणुकीचे वर्ष आहे. या निवडणुकांमध्ये चांगल्या संख्येने विजयी व्हायचे असल्यास सर्वांविषयी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. काम करूनही भारतीय जनता पक्षाविषयी काही गैरसमज आहेत. हे गैरसमज भाषण देऊन दूर होणार नाहीत. त्यासाठी वैयक्तिक संवाद साधावा लागेल, असेही पाटील यांनी सांगितले.