बाजारात सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नाही. एरवी या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. पण सध्या महाराष्ट्रातील महत्वाच्या लातूर, सोलापूर, जालना आणि अकोला तसेच कर्नाटकातील प्रमुख बाजारांतहीतुरीची आवकखूपच कमी आहे.

व्यापाऱ्यांना कमी तूर मिळत असल्याने तूर डाळीचे दरही वाढत आहेत. सध्या महाराष्ट्रात ११५ ते १२० रुपये किलोने तूर डाळ मिळत आहे. तर इतर राज्यांतील दरपातळी १२० ते १३० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे तुरीलाही आधार मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदा देशातील तूर उत्पादन घटले. मागील हंगामात हमीभावापेक्षा कमी दर मिळल्याने शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली. त्यातच पावसामुळे उत्पादनात घट आली. त्यामुळे यंदा तूर मिळत नसल्याचं व्यापारी आणि उद्योगाचे प्रतिनिधी सांगत आहेत.

त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर सरासरी ८ हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत. सध्या देशात तुरीला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळतोय. तूर उत्पादनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये महत्त्वाची आहेत.

तिथे तुरीचे भाव जास्त असल्याने इतर राज्यांतील बाजारांतही तुरीला आधार मिळतोय. यंदा देशात तुरीची उपलब्धताच कमी असल्याने दरपातळी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. सरकार तूर डाळीचे भाव १३० रुपयांपेक्षा जास्त झाल्यास बाजारात हस्तक्षेप करू शकते.