देशातील गव्हाचा हंगाम आता तोंडावर आला. केंद्र सरकारने यंदा देशातील गहू उत्पादनवाढीचा अंदाज व्यक्त केला. पण वाढती उष्णता आणि वादळी पावसामुळे अनेक भागातील गहू पिकाला फटका बसत आहे.

त्यातच वाढलेले गव्हाचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार स्टाॅकमधील गहू विकत आहे. सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यामातून आतापर्यंत ५ टप्प्यांमध्ये लिलाव केले. महामंडळाने पाचव्या टप्प्यात ११ लाख ८७ हजार टन गहू देऊ केला होता.

त्यापैकी फक्त ५ लाख ३९ हजार टर गव्हाचे लिलाव झाले. देशातील काही बाजारांमध्ये नवा गहू दाखल होतोय. त्यामुळं पाचव्या टप्प्यातील लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला. पण पाचव्या लिलावातील किंमत क्विंटलमागं ४ रुपयाने अधिक होती.

लिलावात गव्हाला सरासरी २ हजार १९८ रुपये दर मिळाला. पहिल्या लिलावात सर्वाधित २ हजार ४७५ रुपये दर मिळाला होता. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकार स्टाॅकमधील माल बाजारात आणत आहे. यंदा केंद्राने ३४३ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले.

केंद्राने यंदा गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार १२५ रुपये हमीभाव जाहीर केला. केंद्र सरकारला गव्हाचे भाव कमी करण्यात यश आले. पण पाचव्या लिलावातील दर हमीभावापेक्षा ७३ रुपये अधिक दर मिळाला. त्यातच गहू पिकाचे नुकसान होत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळं खुल्या बाजारात गव्हाचे भाव यंदाही हमीभावापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.